मुंबई (प्रतिनिधी) : २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असून त्याच दिवशी सायंकाळी गोदावरी नदीच्या तिरी महाआरती करणार आहेत. २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या दिवशी नाशिकमध्ये पक्षाचे शिबिर व जाहीर सभा होणार आहे.
स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्कातील त्यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा, धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जानेवारीला अयोध्येत कोणाला निमंत्रण आले? कोण जाणार आणि कोण येणार, यात मला रस नाही. हा अभिमानाचा, अस्मितेचा, आनंदाचा क्षण आहे. मी काही दिवसांपूर्वीदेखील विनंती केली होती की, राम मंदिराचा लोकार्पण हा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा. या कार्यक्रमाला राजकीय रंग येऊ नये. नंतर आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही अयोध्येलासुद्धा जाऊ. मानपानाचा विचार न करता हा आनंदाचा क्षण सर्वांनीच साजरा केला पाहिजे.
एवढी वर्षे राम मंदिरासाठी संघर्ष करावा लागला. २५-३० वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या दिवशी आम्ही नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहोत. या मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरूजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम हा माझासुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्या काळाराम मंदिरात आम्ही जाऊन तिथे रामाचे दर्शन घेऊ. २२ जानेवारीला सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास काळाराम मंदिरात जाऊन आणि नंतर ७:३० वाजताच्या सुमारास प्रभू श्रीराम पंचवटीला काही काळ वास्तव्यास होते, हे पावित्र लक्ष्यात घेऊन त्याच दिवशी गोदा नदीच्या तिरी महाआरतीसुद्धा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले तसेच जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन दर्शन घेऊ, असेही ते म्हणाले. २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या दिवशी नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर होणार आहे. त्याच दिवशी अनंत कान्हेरे मैदान गोल्फ कल्ब येथे शिवसेनेची जाहीर सभादेखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.