पुणे : प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीने छापे टाकल्याने त्यांनी अजित पवार गटासह विरोधकांवर हल्लाबोल करीत बारामती अॅग्रोमध्ये जर काही चुकीचे केलो असतो, तर मी अजित पवार यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलो असतो, असा टोला लगावला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार बच्चा आहे. त्यावर आमचे प्रवक्ते बोलतील, असे म्हटले. यावरून आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
बारामती अॅग्रोमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने काल ६ ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धाडीनंतर आज बोलताना त्यांनी थेट अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा साधला. सात-आठ दिवसांपूर्वी अजितदादा मित्रमंडळाचे कोण दिल्लीत गेले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मी खरीच चूक केली असती तर अजितदादांसोबत भाजपमध्ये जाऊन बसलो असतो, आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. माझा आक्षेप ईडीच्या अधिका-यावर नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा सूचक विधान केले. यामुळे आता अजित पवार गटही आक्रमक झाला आहे. त्यातच अजित पवार यांनी तर आमदार रोहित पवार बच्चा असल्याचे सांगतानाच आमचे प्रवक्ते योग्य ते उत्तर देतील, असे सांगून संघर्षाचे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्यात शाब्दिक फैरी झडण्याची शक्यता आहे. यावरून राजकीय संघर्षही चांगलाच पेटू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चे मन के सच्चे, रोहित पवारांचे प्रत्युत्तर
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत रोहित पवारांना बच्चा संबोधल्यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी एका जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्याची एक क्लीप शेअर केली. त्यात बच्चे मन के सच्चे, जगके आखों के तारे… पण या गाण्याच्या अनुषंगाने रोहित पवारांनी सूचकपणे या ट्विटला कॅप्शन दिले बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…असे म्हटले.