नवी दिल्ली : भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर थायलँडच्या राजदूत पिमचानोक वॉनकोपोर्न पिटफील्ट यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताने याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला होता. थायलँडमधील एका वरिष्ठ सरकारी अधिका-याच्या माहितीनुसार, पिटफील्ट यांना राजदूत पदावरुन हटवण्यात आले असून त्यांना देशात परत बोलावण्यात आले आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या १३ व्या मंत्रिस्तरीय संमेलनात बोलताना पिटफील्ट यांनी भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर टीका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर थायलँड सरकारने कारवाई केली आहे.
थायलँडच्या विदेश सचिवांनी पिटफील्ट यांची जागा घेतली आहे. परिषदेचा पाचव्या दिवशी पिटफील्ट म्हणाल्या होत्या की, भारताचा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एमएसपीवर तांदुळ खरेदी करण्याचा कार्यक्रम लोकांसाठी नाही, तर निर्यात बाजारावर ताबा मिळवण्यासाठीचे हे धोरण आहे.
भारताने पिटफील्ट यांच्या या टिप्पणीनंतर थायलँडकडे आपला विरोध दर्शवला होता. तसेच डब्ल्यूटीओ प्रमुख, कृषी समितीच्या प्रमुख केन्या आणि यूएईकडे नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी संबंधितांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिकारी म्हणाले की, थायलँड राजदूतांना बदलण्यात आले आहे.