25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
HomeFeaturedहवेतल्या हवेत दागिन्यांवर डल्ला; २०० विमानात चोरी

हवेतल्या हवेत दागिन्यांवर डल्ला; २०० विमानात चोरी

नवी दिल्ली : प्रतिनिधी
विमानांमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणा-या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील दागदागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरणा-या एका हायप्रोफाईल चोराला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली. या चोराचं नाव राजेश कपूर असे आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विमानामधून प्रवास करतानाच चो-या करायचा. तो विमानातून प्रवास करत असताना प्रवाशांच्या हँडबॅगमधील दागिने आणि इतर मौल्यवान सामानावर डल्ला मारायचा. पोलिसांनी पहाडगंज परिसरातून आरोपी राजेश कपूरला अटक केली.

या हायप्रोफाईल चोराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश कपूरने चोरी करण्यासाठी मागच्या वर्षभरात तब्बल २०० हून अधिक वेळा विमान प्रवास केला. तसेच यादरम्यान, तो ११० दिवसांहून अधिक काळ केवळ विमानामध्येच राहिला. राजेश कपूर याला पहाडगंज येथून अटक करण्यात आली असून, त्याने तिथेच चोरीचे दागिने आणि इतर मुद्देमाल लपवून ठेवला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त (आयजीआय) उषा रंगनानी यांनी दिली आहे.

आरोपी हा ऐवज शरद जैन यांना विकण्याच्या तयारीत होता. त्यालाही करोल बाग येथून अटक करण्यात आली आहे. रंगनानी यांनी सांगितले की, मागच्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विमानांमधून चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी आयजीआय विमानतळावर एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने हैदराबादमधील पाच विमान प्रवासादरम्यान झालेल्या चोरींमध्ये आपला हात असल्याचे मान्य केले. तसेच बहुतांश रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगारामध्ये खर्च केल्याचे आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांच्या ११ घटनांमध्ये तो सहभागी असल्याचे समोर आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR