मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल काही तासांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने नवा वाद उफाळला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेऊन नार्वेकर-शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. त्याबाबत आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात, याची कल्पना माजी मुख्यमंत्री यांना असायला हवी, असे माझं मत आहे. तरी ते का आरोप करत आहेत. यामागील हेतू स्पष्ट होतो. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामे असतात. मुख्यमंत्र्यांच्यासोबत माझी बैठक ३ तारखेला नियोजित होती. पण मला कोरोना इन्फ्ल्यूयेनजाची लागण झाली. त्यामुळे मी भेटू शकलो नाही. कुलाबाच्या ब्रिजबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील ८ रस्त्याचा मुद्दा होता. हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असं राहुल नार्वेकर म्हणाले. विधिमंडळातील कंत्राटी कामगार याबाबत भेट होती. जे स्वत: माजी मुख्यमंत्री होते, ज्यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याची माहिती आहे त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. आज मी व्हीआयपी लाँजमध्ये अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? मी अनेकदा अनेकांना भेटतो ती काय राजकीय भेट असते का? मी त्यांना भेटू नये असा अर्थ होतो का, असे प्रश्न राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.