28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीयस्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

लखनऊ : देवी लक्ष्मीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लखनऊमधील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने शनिवारी वजीरगंज पोलीस ठाण्याला स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणा-या समाजवादी पार्टीच्या नेत्याला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. देवी-देवतांविरोधात वक्तव्य करून लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपांखाली सपाचे माजी सरचिटणीस आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सात दिवसांत एफआयआरची प्रत न्यायालयात पाठवण्यास सांगितले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर लक्ष्मी देवीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.

विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस मौर्य यांच्या विरोधात तसेच प्रसार माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार रागिणी रस्तोगी यांनी आरोप केला आहे की, गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

यापूर्वीही स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू आणि सनातनींच्या धार्मिक भावना भडकावणा-या अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अहवाल मागवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR