रतात सुरू असलेला एकदिवसीय विश्वचषकाचा महासंग्राम आता ऐन भरात आला आहे. जगभरातील दहा देशांचा समावेश असणा-या या विश्वचषकाचा महाअंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असला तरी हळूहळू याबाबतचे चित्र स्पष्ट होत चालले आहे. अर्थात सहभागी झालेले सर्वच संघ प्रचंड महत्त्वाकांक्षेने आणि ताकदीनिशी उतरलेले असल्यामुळे ही स्पर्धा रंजक ठरत आहे. या विश्वचषकामध्ये भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. परंतु भारताचा नेट रनरेट अजूनही न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे. न्यूझिलंडला पराभूत करत सलग पाचवा विजय मिळवणा-या भारतीय संघाने गुणतालिकेत दोन गुणांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचे सहा सामन्यांतून १२ गुण झाले असून, न्यूझिलंड आठ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंडने मोठे विजय मिळवल्यामुळे त्यांचा नेट रनरेट वाढलेला आहे. भारताकडून पराभूत होऊनही त्यांच्या नेट रनरेटवर परिणाम झालेला नाही. रनरेटबाबत सध्या दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिका हा एक तुल्यबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्याची एकंदर स्थिती पाहता या विश्वचषक स्पर्धांच्या सेमीफायनलमध्ये भारताबरोबरच न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांपैकी कोणता संघ यामध्ये समाविष्ट होतो हे लवकरच स्पष्ट होईल.
मुळातच या संपूर्ण विश्वचषक स्पर्धांदरम्यान भारतीय संघाची कामगिरी ही अत्यंत वाखाणण्याजोगी राहिली आहे. रोहित शर्माच्या आक्रमक नेतृत्वाखाली खेळणा-या संघाने सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कमी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्माला त्याचा फॉर्म शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला असला तरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या विजयात त्याने फटक्यांची आतषबाजी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने फक्त ८४ चेंडूत १३१ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही केवळ ६३ चेंडूत रोहितने धडाकेबाज ८६ धावा केल्या. या स्पर्धेत भारत ज्या निर्भयतेने खेळत आहे त्यामुळे सर्वच संघ भांबावले आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर हे सामने खेळले जात आहेत, हे यामागचे एक कारण असेलही; परंतु भारतीय संघामध्ये दिसणारा आत्मविश्वास, अचूक रणनीती, सांघिकता अजोड आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीही आघाड्यांवर भारतीय संघ भक्कम असल्यामुळे नाणेफेकीचा निकाल काहीही लागला तरी संघाची रणनीती तयार असते. फलंदाजीची कमान विराट, रोहित, शुभमन गिल यांसारखे खंदे फलंदाज सांभाळत असताना गोलंदाजीमध्ये जसप्रित बुमराहची तोफ प्रतिस्पर्धी संघाला भगदाड पाडत आहे. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या या गोलंदाजांचा माराही प्रभावी ठरला आहे. भारतीय खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका झाल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी संघाला विशिष्ट मर्यादेत रोखण्यात यश आले आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर जीवतोड कामगिरी करत परस्परांमधील समन्वयाने टीम इंडियाने ही अजयता पटकावली आहे.
आगामी काळाचा विचार करता भारतासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आव्हान प्रबळ राहील असे दिसते. तथापि, हा सामना होईपर्यंत भारताने आणखी काही विजय खिशात टाकले असल्यास संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावलेला असेल. न्यूझिलंडच्या संघाचाही पुन्हा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पण आधीच्या सामन्यातील बलस्थाने आणि उणिवांचा अभ्यास करून टीम इंडिया मागील विजयाची पुनरावृत्ती करेल. विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे विजयदेखील दणदणीत राहिले आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून, दुस-या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ गडी राखून आणि तिस-या सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. पुण्यातील चौथ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि २७३ धावांवर न्यूझिलंडचा संपूर्ण संघ गारद करून चार गडी राखत पराभव केला. विश्वचषक स्पर्धांमधील सामन्यात असणारा दबाव लक्षात घेता दणदणीत विजय मिळवणे हे कठीण मानले जाते. परंतु ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांमुळे क्रिकेटबाबतचे पूर्वीचे तर्क आता पालटून गेले आहेत. दोन दशकांपूर्वी एकदिवसीय सामन्यात २५० ची धावसंख्या ही खूप मानली जात असे; पण आता २० षटकांमध्ये याहून अधिक धावसंख्या पाहायला मिळते. भारतीय संघाच्या धडाकेबाज खेळाडूंनी टी-२० सामन्यात तडाखेबंद फलंदाजी करून हे कसब अंगी बाणवले आहे.
– सुभाष वैद्य, क्रिकेट अभ्यासक