28.7 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचे अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यंदाचा हा ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोप-यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केले. याचसोबत सगळ्याच पक्षाचे नेते आज चैत्यभूमीवर येत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. या आंबेडकरी अनुयायींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २५० अधिकारी, २ हजार कर्मचारी, सीआरपीएफच्या ९ तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरवलेल्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे १८ हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम. बाबासाहेबांनी भारताला कायदे दिले. त्याचसोबत शिक्षण, अर्थव्यवस्था, शेती याचे विचार दिले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली. अलीकडेच २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला, ही अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी केला. त्यांच्या विचारांनी देशाला नवी दिशा दिली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

संविधान वाचवले पाहिजे : वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी आज आलो आहे. बाबासाहेबांनी लाखोंचा उद्धार केला. देशाला सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आहे की आपण सर्वांनी मिळून संविधान वाचवले पाहिजे, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

संविधान सुरक्षित ठेवण्याचा संकल्प : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दीक्षाभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलो. संविधानाचे चारही स्तंभ केंद्र सरकार रोज तुडवत आहे. संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारला खाली खेचण्याचा संकल्प आज करावा लागेल. गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आणण्याचे काम या सरकारने केले. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्येत पण महाराष्ट्र नंबर १ वर सरकारने आणला, असे पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR