नागपूर : रोकड एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी नेली जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्या आधारावर तहसील कर्मचारी, पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली. यात १ कोटी ३५ लाख रुपये दुचाकीने नेले जात असताना बॅगमधून मिळून आले. तसेच वाशिम शहर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी एका व्यापा-याकडून २५ लाखांची रोकड जप्त करून जिल्हा कोषागारात जमा केली.
नागपूरमधील सेंट्रल अव्हेन्यू रोडवर दुचाकीस्वार जात असताना पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याच्या बॅगेमध्ये १ कोटी ३५ लाख ५९ हजार रुपये मिळून आले. या पैशांचा कोणताही खुलासा ते करु शकले नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पैशांचा गैरवापर होण्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे ही रोकड जप्त करुन आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
११ नोव्हेंबरपर्यंत ४९३ कोटी जप्त : राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात कारवाईचे सत्र सुरु आहे. १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले. एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.