पूर्णा : झिरो फाटा-पूर्णा रोडवरील कात्नेश्वर शिवारात बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भरधाव वेगातील आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या दहा ते बारा फुट खोल खड्यात कोसळला. या अपघातात एक परप्रांतीय मजूर जागेवर ठार झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अतिगंभीर असल्याचे समजते. जखमींवर परभणी येथे उपचार सुरू आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो एम.पी. ०९ झेड एम ६२२७ चा अक्षरश: चुराडा झाला. टेम्पोमध्ये समृद्धी महामार्ग कामासाठीचे सेंट्रींग, लोखंडाचे प्लेट नेण्यात येत होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय चापके, पंढरीनाथ चांदणे, कात्रेशवर पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर, पोलिस पाटील एरंडेश्वर बापूराव राऊत आणि पोलिस पाटील आहेरवाडी बालाजी मोरे यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवले.
या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहन बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पुर्णा पोलिसांनी प्रयत्न केले. पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे.

