धाराशिव : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. दिपक शिवाजी तोडकर रा. गणेशनगर, धाराशिव असे मयताचे नाव आहे. हा अपघात २ डिसेंबर रोजी मेघमल्हार भोजनालय जवळ झाला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे दि. ८ डिसेंबर रोजी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गणेशनगर, धाराशिव येथील मयत दिपक शिवाजी तोडकर, (वय २३) व जखमी रोहीत सोमेश्वर मोदी हे दोघे दि. २ डिसेंबर रोजी स्कुटी क्र एमएच २५ एटी ६७५४ वर बसुन हॉटेल मेघमल्हार भोजनालय धाराशिव येथून जात होते. दरम्यान अज्ञात एस.टी. बस चालकाने त्याचे ताब्यातील बस ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दिपक तोडकर यांचे स्कुटीला ओव्हर टेक करत असताना धडक दिली.
बसचा स्कुटीला धक्का लागून स्कुटी खाली पडल्याने दिपक तोडकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रोहीत मोदी हा किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी मयताचे वडील शिवाजी नागनाथ तोडकर यांनी दि. ८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १३४ (अ) (ब), १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.