25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeसोलापूरयंदा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

यंदा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

सोलापूर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र जिल्ह्यातील एक लाख १८ हजार ११७ विद्यार्थी अद्यापही नवीन पुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्या विद्याथ्यर्थ्यांना जुन्या पुस्तकांवरच नवीन शैक्षणिक वर्ष काढावे लागणार आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात. यासाठी जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार ७२५ विद्यार्थी पात्र आहेत. त्यातील दोन लाख ७५ हजार ६०८ विद्यार्थ्यांनाच पाठ्यपुस्तके वाटप केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ३० टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळावीत, अशी मागणी पालकांतून होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शासनाकडून जिल्हा परिषद,नगरपालिका, अनुदानित शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत करण्यात येते. मात्र शासनाकडून फक्त ७० टक्के विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्या नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील पालकांकडून होत आहेत. याबाबत शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या एकूण पटसंख्येच्या ७० टक्के पुस्तकांची मागणी करावी, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याला १४ लाख ७५ हजार ९६२ पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार पाठ्यपुस्तके आली होती. त्याचे वाटप विद्यार्थ्यांना केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि बालभारतीकडे पहिली वर्गासाठी तीन हजार ३७८ सेमी इंग्रजी पुस्तकांची मागणी केली आहे. लवकरच सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाची काही पुस्तके शिल्लक आहेत. मागील वर्षाची १० टक्के पुस्तके चांगली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने ७० टक्के पुस्तके उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. पाठ्यपुस्तकांचे वाटप करूनही काही तालुक्यांत पाठ्यपुस्तक संच शिल्लक आहेत. पाठ्यपुस्तके कमी असलेल्या शाळांना शिल्लक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR