25.5 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रअटल सेतूवर आणखी एक वर्ष टोल सवलत, ५०० ऐवजी २५० रुपये टोल

अटल सेतूवर आणखी एक वर्ष टोल सवलत, ५०० ऐवजी २५० रुपये टोल

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर टोल आकारणी करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०० ऐवजी २५० रुपये इतकाच टोल द्यावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याला मान्यता देण्यात आली.

एमएमआरडीएतर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलो मीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लोकसभा तसेच त्यानंतर येणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सेतूवर सवलतीच्या दरात म्हणजेच २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा हा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच टोल आकारणीस मान्यता देण्यात आली.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर टोलवाढ केली असती तर जनतेत त्याचे पडसाद उमटले असते. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सवलतीच्या दरात टोल आकारणीस पुन्हा एकदा वर्षभराची मुदतवाढ दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR