परभणी : राज्यभरात मोटारसायकल चोरणारा एक आरोपी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून परभणीसह इतर जिल्ह्यातील अनेक मोटारसायकली चोरल्याची माहिती प्राप्त झाली. बीड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकल हस्तगत केली असून या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज आहे.
जिल्ह्यात होणा-या मोटारसायकल चोरीची गांभीर्याने दखल घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याकरीता आदेश बजावले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी पथके तयार केली व चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास सुरु केला. पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अंमलदार विलास सातपुते, विष्णू चव्हाण व मधुकर ढवळे यांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मानवत तालुक्यातील रुढी येथील कृष्णा बालासाहेब होंडे यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे इतर साथीदार विशाल उत्तम कोळसे, मार्तंड गणेश कोळसे (रा. लोणगाव ता. माजलगाव) या दोघांच्या साथीने मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले.