लातूर : विशेष प्रतिनिधी
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६ प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. परंतु भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरी लक्षात ठेवत विधानसभेला एकजूट आणि मजबूत युती दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.
‘एनडीए’ बैठकीत २८८ मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. ज्यात मित्रपक्ष एकनाथ श्ािंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणा-या जागांचाही आढावा घेण्यात आला. महायुतीत २४० जागांवर एकमत झाले असून उर्वरित ४८ जागांबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार किंवा लोकसभेत पराभूत झालेले, तिकीट न मिळालेले यांना उतरवण्याचे कुठलेही नियोजन नसल्याचेही समोर आले आहे.
मराठवाडा शिंदेसेना; विदर्भ, प. महाराष्ट्र, मुंबई भाजप-राष्ट्रवादीकडे
तिकिटांबाबत पुढील निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षाच्या राज्यातील नेत्यांना देण्यात आले आहेत. युतीत जागावाटप हे विभागवार कुणाची किती जास्त ताकद आहे त्याआधारे केले जाईल. उदा. मराठवाड्यात शिवसेना जास्त जागा लढवेल, भाजप आणि राष्ट्रवादी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईवर लक्ष केंद्रीत करेल. विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्यात येणार आहेत.
भाजप-कॉँग्रेस, शिंदे-ठाकरे सेना, पवार गटात थेट लढत
श्ािंदेसेना-ठाकरेसेना आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आमनेसामने लढत होण्याची शक्यता आहे. बहुतांश जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होऊ शकते. उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरी उघडपणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाकडून ग्राऊंड लेव्हला आधीपासून काम करण्यात येत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष एकाचवेळी यादी जाहीर करू शकतात.
एकत्रित संयुक्त सभा, दिवाळीनंतर मोदींची रॅली
राज्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित संयुक्त सभा घेतील. केंद्रीय नेतेही युतीच्या प्रचाराला येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सहा विभागात सहा रॅली घेतील, दिवाळीनंतरच या रॅलीला सुरूवात होईल अशी माहिती आहे. हरियाणातील निवडणुकीत भाजपच्या विजयात आरएसएसचा मोठा वाटा होता. याठिकाणी निवडणुकीत १६ हजाराहून अधिक बैठका स्वयंसेवकांनी घेतल्या होत्या. हरियाणात जेवढ्या सभा, बैठका झाल्या त्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रात चार पट सभा घेणे अपेक्षित आहे.