मुंबई : नवीन लाल कांद्याची राज्यातील प्रमुख बाजारात मोठया प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे २०२३ या वर्षात कांद्याच्या भावाने शंभरी गाठली होती. परिणामी घरांचे बजेट बिघडले होते. मात्र यंदा नववर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दराबाबत ग्राहकांना दिलासा मिळाला असून आवक वाढल्याने कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत.
सध्या महाराष्ट्रातून नाशिक, पुणे, जुन्नर, मालेगाव, ओतूर या भागातून कांद्याची आवक होत आहे. दररोज अनेक गाड्या येत असल्याने बाजारातील कांद्याची मागणी पूर्ण होत आहे. विशेष म्हणजे, हा चालू हंगामातील ओला कांदा आहे. तो साठवून ठेवण्यासारखा नाही. त्यामुळे त्याचे दरही नियंत्रणात आहेत. घाऊक बाजारात १० ते २० रुपये किलोने हा कांदा विकला जात आहे. आतापर्यंत घाऊक बाजारात कांद्याचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत होते. मात्र नवीन कांद्याच्या आगमनामुळे दर नियंत्रणात आले आहेत. परिणामी १० ते २० रु. किलो दराने कांदा विकला जात आहे, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
सध्या तरी दर कमी असल्याने आणि आवक समाधानकारक असल्याने कांद्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे.
नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात सुरू झाली असून, लाल कांद्याच्या दरात घट झाली आहे. सध्या बाजारात कांदा मुबलक उपलब्ध असून, तूर्तास कांदा दरात वाढ होणार नाही.
आता मार्चपर्यंत बाजारात आवक
आता मार्चपर्यंत बाजारात या कांद्याची आवक होत राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर नियंत्रणात राहतील, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. मार्चनंतर नवीन, साठवणुकीच्या कांद्याची आवक सुरू होईल. त्यामुळे तेव्हा दरांत बदल होण्याची शक्यता आहे. मात्र त्यावेळचे दर कांद्याच्या उत्पादनावर अवलंबून राहणार आहेत.
१०० गाड्या बाजारात दाखल
घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने किरकोळ बाजारातही कांदा १० ते २० रुपये किलोपर्यंत आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सध्या बाजारात हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू आहे. या कांद्याच्या दररोज सरासरी १०० गाड्या बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे कांद्याचे दरही नियंत्रणात आले आहेत.