नाशिक : प्रतिनिधी
सततचा हवामान बदल, उशिरा आलेली रोपे आणि जानेवारीपासूनच वाढलेले तापमान यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी चार महिने सतत पडलेल्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली, परिणामी लागवड लांबली. याचा परिणाम उत्पादनावर होणार असून, आधीच कमी झालेले उत्पादन वाढत्या तापमानामुळे अधिकच घटण्याची शक्यता आहे. कांद्याच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. मात्र, जानेवारीपासूनच उन्हाचा तीव्र प्रभाव वाढल्याने कांदा रोपांची वाढ थांबली आहे.
कांदा पिकातून समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक शेतक-यांनी गहू आणि भाजीपाला लागवड करण्याचा पर्याय निवडला. मात्र, गव्हाच्या उत्पादनातून ही अपेक्षित नफा होणार नाही. पाण्याची पातळी कमी झाल्याने इतर पिकांची लागवडही अडचणीत आली आहे.
खराब झालेल्या कांद्याच्या रोपांमुळे अनेक शेतक-यांना दुबार रोपांची पेरणी करावी लागली. कांद्याच्या रोपांची किंमत प्रति पायली २५ हजार रुपये असल्याने शेतक-यांवरील आर्थिक भार वाढला. दुबार पेरणीसाठी बियाण्यावर १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागला.