नाशिक : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळाला. अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे.
कांद्याच्या दरात घसरण झाल्याने आता नाफेडकडून कांदा खरेदी केली जाऊ शकते. याकडे कांदा उत्पादक शेतक-यांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. त्यात भारत पाकिस्तान युद्धामुळे भारताने पाकिस्तानात निर्यात बंदी केली आहे. तसेच बांगलादेशात राजकीय परिस्थिती बिकट असल्याने तिकडेही कांदा निर्यातीत घट झाली आहे.
नाफेड आणि एनसीसीएफकडून अद्याप कांद्याची खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांचे लक्ष आता या खरेदीच्या सुरुवातीकडे लागले आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढलेली असून मागणी मात्र कमी असल्याने कांद्याच्या दरावर थेट परिणाम झाला आहे.
पुरवठा वाढल्याने दर कोसळले
देशांतर्गत पुरवठा वाढल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला ११५१ रुपये दर मिळाला, तर नाशिक बाजार समितीत हा दर ९०० रुपये होता. येवला बाजार समितीत केवळ ८५१ रुपये दर नोंदवण्यात आला. मनमाड आणि पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याचा दर ११०० रुपये इतका होता.
बळीराजा पूर्णपणे हवालदिल
देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते, आणि लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, कांद्याचे बियाणे तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, परिणामी बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.