22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बसणार चाप!

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बसणार चाप!

नागपूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांची, गुंतणूकदारांची आर्थिक फसवणूक करून आरोपी विदेशात पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. फसवणुकीसाठी विदेशातून विविध प्रकारची ऍप चालवली जातात. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत याचे जाळे पसरले आहे. त्यामुळे अशा प्रकारची आर्थिक फसवणूक आणि गुन्हे रोखण्यासाठी राज्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत क्विक रिस्पॉन्स सिस्टिम उभारली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

कोल्हापूर आणि सांगली येथील गुंतवणूकदारांची ए. एस. ट्रेडर्स आणि त्यांच्या अन्य कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्य सरकार तयार करीत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने क्विक रिस्पॉन्स सिस्टिमविषयी सादरीकरण करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात अन्य राज्यांना असे मॉडेल तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. त्यामुळे बँक, वित्तीय संस्था, समाज माध्यमातील विविध ऍप हे एकाच प्लॅटफॉर्मवर येतील, असे फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर आणि सांगलीतील गुंतवणूकदारांची ए. एस. ट्रेडर्ससह अन्य आस्थापनांकडून ४० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात ३५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील १३ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी पहिले आरोपपत्र सादर केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अन्य राज्यांशी समन्वय साधून पोलिस तपास सुरु आहे. या गुंतवणुकीतील पैसा विदेशात गेला असेल तर पीएमएलए कायद्याअंतर्गत चौकशीसाठी ईडीची मदत घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

अंतर्गत सेल तयार करणार
जनतेची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत सेल तयार केले जातील. सुरुवातीला चार ते पाच पोलिस आयुक्तालयात ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

डीपफेकविषयी जागृती हवी
राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून आपण त्यांच्या जवळचे आहोत, असे भासवून अनेकजण जनतेची फसवणूक करतात. त्यामुळे जनतेने अशा व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेवू नये. मात्र, आता तर डीपफेकमध्ये कुणीही कोणासोबतही छायाचित्र जोडून फोटो काढता येतो. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. आमच्या सोबत कुणी कुणाचे फोटो दाखवले तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR