23.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील धरणांमध्ये ६४ टक्केच पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्केच पाणीसाठा

प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमीच असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे ३७ टक्के पाणीसाठा आहे. मिळालेल्या आकडेवारीवरुन कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वात कमी पाणीसाठी हा छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये आहे.

राज्यातील २९९४ धरणे आहेत. त्यामध्ये १३८ मोठी, २६० मध्यम तर लहान आकाराची २५९४ धरणांचा समावेश आहे. राज्यातील धरणांची १४३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी क्षमता आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सर्व धरणांमध्ये सुमारे ६४.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच ९२९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या दिवशी ८९.१६ टक्के पाणी शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.२८ टक्के पाणीसाठा कमी असून, तेवढीच तूट आहे.

विभागात पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने करायचे. एकूण साठ्यापैकी किती टक्के पाणी पिण्यासाठी अथवा शेतीसाठी वापरायला द्यायचे याचा निर्णय कालवा सल्लागार समितीला जानेवारीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची चिन्हे आहेत. उजनीत सद्या २१.४७ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच दिवशी (शुक्रवारी) राज्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र, ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

राज्यात यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणे भरण्यास मदत झाली. पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश पिके वाया गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ स्थिती असल्याचे जाहीर केले होते

मराठवाड्यातील पाणीप्रश्न गंभीर
छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये फक्त ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात राज्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा छत्रपती संभाजीनगर विभागाला बसण्याची भीती आहे. तसेच अमरावती विभागात खडकपूर्णा, नळगंगा या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने तेथे चिंतेचा विषय आहे.

विभागानुसार आकडेवारी
पुणे विभागातील धरणांमध्ये ६७ टक्के, नाशिक विभागातील धरणांमध्ये ६८ टक्के, अमरावती विभागातील धरणांमध्ये ७४ टक्के, नागपूर विभागातील धरणांमध्ये ६९ टक्के, कोकण विभागातील धरणांमध्ये ७९ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR