26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात २०२९ ला एकट्या भाजपाचे सरकार येईल

महाराष्ट्रात २०२९ ला एकट्या भाजपाचे सरकार येईल

अमित शाह यांचे भाकित राज्यात पुन्हा सरकार आल्यानंतर समान नागरी कायदा आणणार

मुंबई : गेल्या ६० वर्षांत प्रथमच सलग ३ वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. महाराष्ट्रातही महायुतीचंच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही; पण गाफील राहू नका, फाजील आत्मविश्वास बाळगू नका. लोकांपर्यंत जा, महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढवा, १० टक्के मतदान वाढले की विजय महायुतीचाच होईल, असा दावा करताना, महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणण्याची घोषणा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत केली. या निवडणुकीत महायुतीचे तर २०२९ मध्ये एकट्या कमळाचे राज्य येईल, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभेला दणका बसल्याने भाजपाचे चाणक्य म्हणून परिचित असलेल्या अमित शहा यांनी महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची निवडणूक रणनिती ठरवण्यापसून ते महायुतीतील जागावाटप अंतिम करण्यापर्यंत अमित शहा यांची भूमिका आहे. गेल्या आठवड्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अमित शहा हे आज मुंबईच्या दौ-यावर आले आहेत. आज त्यांनी दादरच्या योगी सभागृहात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतील अपयशाने आलेली निराशा झटका आणि कामाला लागा. प्रत्येक बुथवर किमान २० लोकांना भाजपचे सदस्य करा. प्रत्येक बुथवर आपले १० कार्यकर्ते हवे आहेत. या कार्यकर्त्याना दस-यापासून विधानसभा निवडणूक प्रचार संपेपर्यंत कामात व्यग्र ठेवा. आपल्या विचारांचे मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरवा. आपले मतदान १० टक्क्यांनी वाढल्यास विजय आपलाच आहे, अशा सूचना देत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांनी मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत शहा यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार आणण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांना दिले.

जे सरकार काम करत तेच सरकार पुन्हा निवडणूक जिंकते त्यामुळे देशात आपण सलग तिसरे सरकार बनवू शकलो. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्वेक्षणाचा विचार करू नका. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम आत्मविश्वास शहा यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात सत्ता आल्यास देशात समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असेही शाह म्हणाले. भाजप केवळ राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे. राम मंदिर, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविणे हे काम करण्यासाठी भाजप सत्तेत आली.

भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या १० वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे, असेही शहा यांनी सांगितले. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. राज्यातील लोकसभेच्या ६ जागा अशा आहेत जिथे एका लोकसभेच्या ५ विधानसभा मतदारसंघात आपल्याला बहुमत आहे; पण एका ठिकाणी विरोधक बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ सहापैकी पाच विधानसभा आपण जिंकू तर ते एकच जिंकतील, असेही अमित शहा म्हणाले. एक काळ असा होता की, लोकसभेत आपल्या फक्त दोन जागा होत्या त्यावेळीही आपला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. ऐंशीच्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती असायचे, आपण निवडणूक हरणार आहोत तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात कुठल्याही पदासाठी आलेलो नाही. सरकार येते व जाते, पक्ष निती व विचार सोडतात, आपले सरकार १० वर्षे चालले; पण आपण विचार किंवा निती सोडली नाही, असे शाह म्हणले..

ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका : फडणवीस
आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत आणि जिंकण्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार आहेत त्यामुळे फाजील आत्मविश्वास ठेवू नका, गाफील राहू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला. सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक सरकारी योजनांचे लाभार्थी आहे. त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पु्न्हा येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या वेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR