25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ‘ऑपरेशन ढाका’!

राज्यात ‘ऑपरेशन ढाका’!

बांगलादेशी घुसखोरांचा शोध सुरू मुंबई रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई झाली असून घुसखोरांविरोधात २ शहरांमध्ये एसआयटी तपासणी सुरू आहे. अनेकांकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. तपासाच्या चौकटीत अनेक सरकारी अधिकारी आणि नेतेही आहेत. व्होटबँकसाठी बनावट कागदपत्रे बनवले जातात. ही कागदपत्रे बनवण्यामागे मोठे रॅकेट आहे जे बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या विविध शहरांमध्ये स्थायिक करण्याचे कट रचत असल्याने आता राज्यात ‘ऑपरेशन ढाका’ राबविण्यात येत आहे.

बरेच बांगलादेशी घुसखोर असे आहेत जे मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच विविध रहस्य समोर येत आहेत. या घुसखोरांकडून पोलिसांना मिळणारी माहिती धक्कादायक आहे. अखेर या घुसखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, दिल्लीतही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई झाली होती. दिल्लीच्या कालिंजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार इथं घुसखोरांची शोध मोहिम सुरू होती. दिल्ली पोलिसांनी ब-याच घुसखोरांना पकडून पुन्हा बांगलादेशात पाठवले.

महाराष्ट्रात ज्या लोकांना पकडले, हे लोक मुंबईत गेली कित्येक वर्ष राहत होते. त्यांच्याकडे ती सगळी कागदपत्रे होती जी भारतीय नागरिकाकडे असतात परंतु हे सर्व बांगलादेशी घुसखोर असल्याचं सत्य समोर आले. आपली ओळख पटवण्यासाठी या लोकांनी जी कागदपत्रे पोलिसांना दाखवली ती सर्व बनावट असल्याचं सिद्ध झाले. त्यात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्डसह पासपोर्टही आहे. बनावट कागदपत्रे बनवणा-यांचे सिंडिकेट आहे. प्रत्येक बोगस कागदपत्रासाठी रेट ठरलेले आहेत. जर एखाद्या घुसखोराला परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला ५० ते १ लाख रुपये द्यावे लागतात. पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून सापडलेले मोबाईल त्यात ढाकाचे कनेक्शन समोर आले. फोन रेकॉर्डमधून व्हॉट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मिडिया एप्समधून ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्कात असतात.

आतापर्यंत १५ घुसखोर
मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवली आहे. तिथेही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाल्याचं समोर आले आहे. मुंबईतील बोरिवली, एमएचबी कॉलनी, गणपत पाटील नगर, मालवणी, दहिसर इथल्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर सापडले. नवी मुंबईत पनवेल, नेरुळ, उरण परिसरात १२ ते १५ हजार घुसखोर आढळले आहेत.

बनावट कागदपत्रांमुळे घोळ
बांगलादेशी घुसखोरांचे नेटवर्क केवळ बनावट कागदपत्रे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वास्तव्य करण्यापुरते मर्यादित नाही. घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांना मदत करणा-यांना शोधणे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे.

कसे आहेत रेट?
बनावट आधार कार्ड – ५ ते १० हजार रुपये
बनावट रेशन कार्ड – ५ ते १० हजार रुपये
बनावट महाराष्ट्र अधिवास – १० ते १५ हजार रुपये
बनावट पॅन कार्ड – ५ ते १० हजार रुपये

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR