24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeराष्ट्रीयअधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर २५, तर आयकर विधेयकावर १२ तास चर्चा होणार

अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर २५, तर आयकर विधेयकावर १२ तास चर्चा होणार

विरोधकांच्या मागण्या मान्य

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक २१ जुलैपासून सुरू झाले असून पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू होताच संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. दरम्यान, विरोधकांच्या मागणीप्रमाणे सरकार ऑपरेशन सिंदूरसह महत्वाच्या मुद्यांवर चर्चेस तयार झाले आहे. यासाठी पुढील आठवड्यात २५ तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, मात्र पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ झाला. विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाजही व्यवस्थित सुरू होऊ शकले नाही. आज आयकर विधेयक २०२५ वरील निवड समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. तर, राज्यसभेत बिल ऑफ लॅडिंग बिल, २०२५ मंजूर करण्यात आले. पुढील आठवड्यात संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर १६ तास, तर राज्यसभेत ९ तास चर्चा होईल. याशिवाय, लोकसभेत आयकर विधेयक २०२५ वर १२ तास चर्चा होईल. तर, इंडियन पोस्ट विधेयकावर ३ तास चर्चा होईल. याशिवाय, राष्ट्रीय क्रीडा विधेयकावर ८ तास आणि मणिपूर बजेटवर २ तास चर्चा होईल. दरम्यान, टीडीपी आणीबाणीवर चर्चेची मागणी करत आहे. तर, भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी हिमाचलमधील पाऊस आणि पुरावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

मोदींच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक
सोमवारी संसद भवनात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत चालेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR