31.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्र‘ऑपरेशन टायगर’; ठाकरेंच्या खासदारांची ‘वज्रमुठ’

‘ऑपरेशन टायगर’; ठाकरेंच्या खासदारांची ‘वज्रमुठ’

‘ऑपरेशन टायगर’ टप्प्याटप्प्याने होणार सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई : सत्ताधा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही, उलट विसंवाद सुरू आहे. बहुमताने सरकार येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या दिल्या जात आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार एकवटले असून त्यांनी घट्ट वज्रमुठ बांधली असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी नवी दिल्ली इथे एकत्रित पत्रकार परिषद घेत पक्षांतराच्या चर्चेचे खंडन करत शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार केला आहे. आम्ही सर्व पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहोत. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या बाजूला सारण्यासाठी मुद्दाम अशा पुड्या सोडल्या जात आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. मात्र या बातम्यांमुळे आमच्या मतदारसंघांमध्ये आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगले यश प्राप्त झाले आहे. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पुढची पाच वर्षे सत्ताधारी पक्षात बसण्याची ठाकरे गटाच्या खासदारांची इच्छा आहे. मात्र, आता पक्ष फुटला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या कायद्यातून वाचायचे असेल तर सहा खासदारांचा आकडा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या खासदारांच्या बाबतीत पडद्यामागची जुळवणी पूर्ण झाली असून लवकरच हे सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती देखील देण्यात येत आहे.

अनेक लोक संपर्कात : मंत्री सामंत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहून अनेक नेते आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दाखवत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात चालते, हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत, हे निश्चित आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर संदर्भात संकेत दिले आहेत.

बडबड करणारे नेते २-३ दिवसांत शिंदेसेनेत : बांगर
ठाकरे गटात आता काही उरले नाही, त्यांचे सर्वच लोकं आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचे मेन नेते यांचीही शिंदेसेनेत येणार आहेत. आता त्यांचे मेन नेते म्हणजे कोण हे सांगण्याची गरज नाही, मुख्य नेत्यांचा 8 दिवसात शिंदेसेनेत प्रवेश होणार आहे. तर ठाकरे गटाचे बडबड करणारे नेते २-३ दिवसात शिंदेंचे नेतृत्व स्वीकारतील, असे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची यादी
अरविंद सावंत- दक्षिण मुंबई लोकसभा
अनिल देसाई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा
संजय दीना पाटील- ईशान्य मुंबई लोकसभा
संजय जाधव – परभणी लोकसभा
ओम राजेनिंबाळकर – धाराशिव लोकसभा
भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी लोकसभा
राजाभाऊ वाजे – नाशिक लोकसभा
संजय देशमुख – यवतमाळ-वाशीम लोकसभा
नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली लोकसभा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR