अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारसकर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारसकर यांच्यावर पलटवार करण्यात आला. राज्यभर बारसकर यांचा निषेध सुरू झाला. त्यावेळी बारसकर यांनी आपल्याला गावाची साथ असल्याचे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येते.
त्यानंतर आता बारसकर यांच्या सावेडी (ता. नगर) या गावाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गावाने ठराव करून आपण बारसकर यांच्यासोबत नव्हे तर जरांगे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडणात आली, सोबतच गावात ठिकठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सकल मराठा समाजाने केलेल्या तक्रारीनंतर शेजारच्या बोल्हेगाव येथील चौकात बारसकर यांनी केलेले अतिक्रमण आणि महापुरुषाचा पुतळाही काढून टाकण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारे बारसकर नगरच्या सावेडी गाव परिसरात राहतात. जरांगे पाटील यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव भक्कमपणे उभे असल्याचा एकमताने ठराव करण्यात आला आहे. नगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणा-या अजय बारसकर यांचा सर्वानुमते सावेडी गावाच्या वतीने निषेध करण्यात आला.