नवी दिल्ली : खासदार दानिश अली यांनी बसपातून निलंबित करण्यात आल्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आपण भाजपच्या जनविरोधी धोरणांना विरोध करत राहणार असून त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. मला मायावतींकडून नेहमीच खूप पाठिंबा मिळाला आहे पण आजचा त्यांचा निर्णय दुर्दैवी आहे.
ते म्हणाले की, मी माझ्या संपूर्ण मेहनतीने आणि समर्पणाने बसपाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि कधीही पक्षविरोधी काम केले नाही. मी भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांना निश्चितपणे विरोध केला आहे आणि भविष्यातही करत राहीन. काही भांडवलदारांच्या लुटीविरोधात मी आवाज उठवला आहे आणि भविष्यातही ते काम करत राहीन, असे करणे हा गुन्हा असेल तर मी गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे, असे ते म्हणाले.
बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दानिश अली यांना पक्षाने यापूर्वी अनेकदा इशारा दिला होता. दानिश अली गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी त्यांच्याविरोधात ‘अपमानास्पद’ आणि ‘जातीय शिवीगाळ’ केली होती. यावरून बराच वाद झाला होता.