मुंबई : प्रतिनिधी
देशाच्या पक्षांतर्गत बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. नार्वेकरांची नियुक्ती देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पाहिले पाऊल मानायचे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव मागील वर्षभरापासून चर्चेत आहे. कधी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी तर कधी त्यांनी त्यावर दिलेल्या निकालामुळे त्यांचे नाव कायमच चर्चेत राहिले. त्यातच आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी आणि सचिव परिषदेमध्ये परिशिष्ठाची चिकित्सा समितीची रविवारी घोषणा करत राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, राहुल नार्वेकर यांची ही नियुक्ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्नच समजावा लागेल. शिवाय ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशने टाकलेले पाऊल मानायाचे का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उरफाटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, पण त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समाजावा लागेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल. असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल.अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल, असेही ठाकरे म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांची टीका
‘पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांची निवड होणं यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते?’, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे, त्याला यापदी नेमणे म्हणजे संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचे माझ्यावरचे प्रेम जगजाहीर : नार्वेकर
उद्धव ठाकरेंचे माझ्यावरचे प्रेम जगजाहीर आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. आपल्या राज्यातील आपल्या सहका-याला अखिल भारतीय समितीची जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर राज्यासाठी तो गौरवशाली क्षण असतो. अशावेळी शुभेच्छा देऊन विश्वास दर्शवण्यापेक्षा अशी टीका करणे म्हणजे आपल्या राज्याबद्दल आणि आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही हे स्पष्ट होत आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्यावर केलेल्या कामाविषयी बोलण्याची धमक ठेवा. मी जो निर्णय दिला, त्या निर्णयाविरोधात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून देण्याची धमक उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये धमक नाही’’अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकरांनी दिली आहे.