मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना धारावीच्या विकासाचे काम अदानीला मिळावे यासाठी बरेच प्रयत्न झाले; पण सत्ता गेल्यावर मात्र विरोध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मलिदा गोळा करण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाने उठाठेव सुरू केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन अदानींकडून निधी घेतला की नाही? हे सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुंबईला अदानी शहर करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. जानेवारी २०१९ मध्ये महायुतीचे फडणवीस सरकार असताना धारावी पुनर्विकासाचे टेंडर मागे सेकलींक कंपनीला मिळाले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सेकलींकने यातून माघार घेतली.
२०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सेकलींकचे टेंडर रद्द केले होते आणि अदानींना वाट मोकळी करून दिली होती. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता, याचेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे. शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांचे सलोख्याचे संबंध संबंध भारताला माहित आहेत त्यांचा तुमच्यावर दबाव होता का? असा सवाल निरुपम यांनी केला.