अकोला : प्रतिनिधी
अकोल्यातील संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रोगराई वाढत असल्याने संत्रा उत्पादक शेतक-यांसमोर संकट उभे ठाकले आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यात देठसुकी नावाच्या रोगामुळे संत्र्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे येथील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवसरात्र मेहनत करून पिकवलेल्या संत्रा पिकावर रोग पडल्यामुळे अनेक शेतक-यांचा खर्च निघणे कठीण झाले आहे. काही शेतक-यांचे एकरी ६५ टक्के पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
‘देठसुकी’ म्हणजेच संत्र्याच्या झाडांमध्ये फळे लागल्यानंतर त्या फळांचा देठ किंवा तंतू आच्छादित होणे, ज्यामुळे फळांची गळती वाढते आणि उत्पादन घटते. या समस्येमुळे संत्र्यांच्या गळतीत प्रचंड वाढ झालेली आहे, ज्याचा थेट परिणाम शेतक-यांच्या उत्पन्नावर होतो.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला अकोट तालुक्यातील बराचसा भाग हा फळपीक आणि चांगल्या उत्पादनक्षम मालासाठी प्रसिद्ध आहे. मात्र येथील उत्पादक शेतकरी कधी अवकाळी पाऊस, गारपीट, व्यापा-यांची पिळवणूक तर, कधी पिकांवरील रोग याला बळी पडत आहे.
मागील हंगामात हेक्टरमागे १५ लाखांचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी ६१ हजार रुपयांचे संत्र्यांचे उत्पादन शेतक-यांच्या हाती आले आहे. शेतातील प्रत्येक झाडातून ६५ टक्के उत्पन्न वाया जात आहे. शेतशिवारात संत्रा गळतीचे भयावह दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.. केवळ ३५ टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भावही अपेक्षेप्रमाणे नसल्याचे शेतक-यांकडून सांगण्यात येत आहे.