पाथरी : संजय गांधी निराधार समितीचे पाथरी तालुका अध्यक्ष असेफ खान यांनी निराधार लाभार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर पाथरीचे तहसीलदार हांदेशवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाथरी शाखेला प्रत्यक्षात भेट देऊन व्यवस्थापक आणि बँकेतील कर्मचा-यांनी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना वेळेवर योग्य ती मदत करून कामात सरलता आणावी. तसेच हजारो लाभार्थ्यांना शासनाकडून आलेली मदत व अनुदान कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे असे आदेश दिले.
कर्तव्यात कसूर करणा-या तहसील आणि बँक कर्मचा-यांच्या विरोधात मागील दोन-तीन दिवसापासून या समितीचे अध्यक्ष असेफ खान यांनी आंदोलन छेडत संबंधितांना धारेवर धरले होते. याची दखल घेत कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार हांदेशवार यांनी आज बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी तसेच तहसील मधील संजय गांधी निराधार विभागातील कर्मचा-यांची मोठी झाडाझडती घेत लाभार्थ्यांना वेळेवर न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले. यावेळी तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर हंबरडा फोडला. संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष असेफ खान यांच्यासोबत यावेळी समितीचे सदस्य शाहूराव गवारे, कमलताई राठोड, सुनील पितळे, सामाजिक कार्यकर्ते मुजीब आलम यांच्यासह सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.