नागपूर : प्रतिनिधी
भारतातील युवक देशाच्या गरजा डोळ््यासमोर ठेवून काम करीत आहे. खेळाच्या मैदानापासून अंतराळापर्यंत आपल्या तरुणांमध्ये राष्ट्र निर्माणाची भावना वाढली आहे. त्यामुळे संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी विकसित भारताच्या प्रवासाला ऊर्जा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत होते. यावेळी त्यांनी स्मृती मंदिराच्या अभ्यागत पुस्तिकेत एक संदेश लिहिला. त्यानंतर पंतप्रधान मोदी नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीलाही भेट दिली. दरम्यान येथे त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचेही भूमिपूजन केले.
ही संस्था आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आली होती. या नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. युवा शक्ती हीच आपली गुंतवणूक आहे. भारतातील तरुण आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्याची रिस्क टेकिंग कॅपेसिटी आधीपेक्षा अधिक आहे. तो नवीन इनोव्हेशन करत आहे.
स्टार्टअपच्या दुनियेत झेंडा फडकवत आहे. आजचा युवा आपल्या संस्कृतीवर अभिमान बाळगत मार्गक्रमण करत आहे. भारतीय युवकांनी मेक इंडिया यशस्वी केले आहे. हाच युवा २०४७ मध्ये स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा विकसित भारताचा ध्वज घेऊन पुढे जाईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
गुलामीची मानसिकता सोडून प्रगतीकडे वाटचाल
विकसित भारतासाठी देश ज्यामध्ये अडकला होता, त्या बेड्या तोडण्याची गरज होती. आज आपण गुलामीची मानसिकता मागे टाकून प्रगती करत आहोत. आपल्या लोकशाहीच्या अंगणात आता राजपथ नाही कर्तव्यपथ आहे. आपल्या नौदलाच्या ध्वजातही गुलामीचे चिन्ह होते. त्या जागी आता नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.