संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव झाले. रेल्वे स्थानकापासून शहरातील विविध ठिकाणी व जिल्ह्यात सर्वत्र नवीन नावे लागली आहेत. परंतु आता लोकसभा आणि त्यानंतर होणा-या विधानसभा निवडणुकीत काय नावे असणार आहे? धाराशिव व लोकसभा व विधानसभा मतदार संघ असे नाव होणार का? किंवा छत्रपती संभाजीनगर लोकसभा आणि विधानसभा मतदार संघ असे नाव होणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीत उस्मानाबाद मतदार संघ आणि औरंगाबाद मतदार संघ अशीच नावे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
धाराशिव लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे नाव येत्या लोकसभा आणि त्यानंतर होणा-या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद नाव राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर मतदार संघांचे नाव औरंगाबाद असेच राहणार आहे. परीसिमन आयोगाच्या नियमानुसार २०२६ नंतर जनगणना होणार आहे. त्यानंतर मतदार संघाचे नाव व पुनर्रचना होणार आहे. म्हणजेच २०२६ पर्यंत उस्मानाबाद व औरंगाबाद मतदार संघाला पूर्वीप्रमाणेच संबोधले जाणार आहे.
प्रस्ताव आयोगाकडे, असे दिले उत्तर
लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव २८ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्या पत्राला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. यामुळे उस्मानाबाद व औरंगाबाद असेच नाव असणार आहे. दोन्ही शहरांची नाव निवडणुकीसाठी ‘जैसे थे’च राहणार असल्याने राजकीय पुढारी, पक्ष व प्रशासनाची गोची होणार आहे.
उस्मानाबाद व औरंगाबाद या शहरांची नावे बदलली होती. त्यानंतर काही जणांनी हरकती घेतल्या होत्या. काही जण न्यायालयात गेले. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती. परंतु न्यायालयाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला होता.