मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकला थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात असायलाच हवे. हे बाळासाहेबांनी सुरू केलेले हे आंदोलन आहे. या संदर्भात येणा-या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आणि योग्य ती भूमिका घेणार आहे. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्गजवळ हा प्रकार घडला. या घटनेची माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. संबंधित प्रकारामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही, तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात असतात. वाद वाढायला नको. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे सांगत प्रताप सरनाईक यांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आणि चालकाला काळे फासण्याचा प्रकाराचा निषेध आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आजचा नाही, एकनाथ शिंदे यांनी २ महिने कारावास भोगला आहे. कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही त्यांना तसाच धडा शिकवू शकतो. शिवसेनेची स्थापना भल्यासाठी झाली आहे, याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होणार आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी आम्हाला सुरक्षा दिली तरच कर्नाटकात बस घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे.