22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपंचगंगा पात्राबाहेर; ५७ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा पात्राबाहेर; ५७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू असून सोमवार दि. ८ जुलै रोजीही दिवसभर एकसारखा पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीचपाणी झाले आहे. शहरात आज सकाळी पावसाने थोडीशी उघडीप दिली होती. मात्र, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३२.०९ फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे.

तब्बल ५७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सकाळच्या तुलनेत ११ वाजेपासून एकसारखा पाऊस सुरू होता. दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ४२ टक्के भरले असून त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १३०० तर वारणा धरणातून ६७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले असून, आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे. विविध नद्यांवरील ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्य मार्ग व चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. पंचगंगेची ३९ फूट पातळी ही इशारा पातळी म्हणून ओळखली जाते.

१२ मालमत्तांची पडझड
चोवीस तासात १२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६ लाख २८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

कोणती आहेत बंधारे?
पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील-चिंचोली, भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ऐनापूर व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडूकली व सांगशी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR