22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘पढेंगे तो बढेंगे’, सचिन पायलट यांचा नवा नारा

‘पढेंगे तो बढेंगे’, सचिन पायलट यांचा नवा नारा

नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मतदारांना ‘बटेंगे तो कटेंगे’ असे सांगत आहेत. त्यांची ही घोषणा अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवणारी व भीती दाखविणारी आहे. सगळ्यांना घेऊन चालण्या ऐवजी ते अशी भाषा बोलतात हे योग्य नाही. अयोध्येत त्यांची लोकसभेची जागा हरली त्याला काय म्हणायचे, असा सवाल करीत ‘पढेंगे तो बढेंगे’ हे काँग्रेसचे धोरण असून ते आम्ही आधीपासूनच राबवित आहोत, असे उत्तर काँग्रेस नेते व राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री खा. सचिन पायलट यांनी दिले.

विदर्भातील निवडणूक प्रचारासाठी खा. सचिन पायलट हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रचारची गती जसजशी वाढत आहे त्याप्रमाणे भाजपचे बोल बिघडत आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितले की आम्ही पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन चालत आहोत. भाजप डबल ट्रिपल इंजिन सरकार सांगते मात्र त्या इंजिनमधून धूर निघत आहे. डबल-ट्रिपल इंजिन सरकार असताना त्यांना निवडणुकीच्या आधी योजनांची घोषणा का करावी लागत आहे, असा सवाल त्यांनी केला. यांनी योजना आणली तर हे दाता आणि विरोधी पक्षाने आणली तर तिला रेवडी वाटणे म्हणणे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही विकासाबद्दल बोलतो. कुणावर चिखलफेक करीत नाही. महाराष्ट्रात आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा त्यांनी केला. डाटा गोळा करण्यासाठी जनगनना आवश्यक आहे. त्यातून कोणाचा किती भाग आहे ते समजते. त्यानुसार त्याचे विभाजन करता येऊ शकते. गरजवंत लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

भाजपने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला होता. मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली. त्यांना ४०० जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी संविधानाशी छेडछाड केली असती, असा दावा सचिन पायलट यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR