इस्लामाबाद : अमेरिका भारताला जगातील सर्वात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट एफ-३५ देण्यास तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीत स्टेल्थ फायटर जेट एफ-३५ देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्ही अमेरिकन लष्करातील सर्वोत्तम स्टेल्थ फायटर जेट एफ-३५ भारताला देण्यास तयार असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या या प्रस्तावानंतर पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते शफकत अली खान यांनी म्हटले की, अमेरिका एफ-३५ फायटर जेटची विक्री भारतला केल्यावर दक्षिण आशियात सैनिक असंतुलन तयार होईल. हे शांततेसाठी चांगले होणार नाही. अमेरिकेचा हा निर्णय दुर्देवी, एकतर्फी, दिशाभूल करणारा आणि राजनैतिक नियमांच्या विरोधातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातही पाकिस्तानला लक्ष्य केले. या दोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल चांगलेच फटकारले.
तसेच पाकिस्तानने आपल्या भूभागाचा वापर दहशतवाद्यांना करू देऊ नये असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. त्यावर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली. अमेरिका आणि भारताचे हे विधान दिशाभूल करणारे आहे. पाकिस्तानने केलेल्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी म्हटले होते.
पाचव्या पिढीचे जेट
एफ-३५ हे पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ जेट आहे. त्यात प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आहे. ओपन आर्किटेक्चर, प्रगत सेन्सर्स आणि इतर अनेक क्षमतांनी हे फायटर सुसज्ज आहे. सुपरसॉनिक स्पीडने उड्डाण करणा-या या विमानास रडारसुद्धा ट्रॅक करू शकत नाही. या जेटच्या पायलटला ३६०-डिग्री व्यू आणि शत्रुच्या हालचाली दिसतात. भारताने एफ-३५ लढाऊ विमान खरेदी करण्यास सहमती दर्शवली तर असे करणारा तो पहिला नॉन-नाटो आणि नॉन-पॅसिफिक अमेरिकेचा सहयोगी बनेल.