मुंबई : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात राज्याच्या पर्यावरण मंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत उत्तर देताना उपाय योजना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण विभागाला केवळ नोटिसा देण्याच्या पलीकडे नेण्याची गरज आहे असे उत्तर देत होत्या. त्यावर आमदार जयंत पाटील यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असाहाय्य पद्धतीने उत्तर देत आहेत. माझ्या हातात काहीच नाही असे सांगत होत्या, असा टोला लगावला. त्यावर पंकजा मुंडेंनी तातडीने स्पष्टीकरण देत मी असाहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे असे सांगितले.
खेडच्या आमदाराच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, इंद्रायणीसोबत राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी टास्क फोर्स करण्याची गरज आहे. पर्यावरण विभागाला फक्त नोटिसा देण्याच्या पलीकडे न्यायची गरज आहे. नोटीस देऊन उत्तर मागण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीत सहभागी करून घेण्याची गरज आहे. नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण विभाग यांचा टास्क फोर्स तयार करून नदी प्रश्नाबाबत एक प्लॅन तयार करण्याची गरज आहे असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हा टास्क फोर्स घेऊन येत आहोत.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उत्तरानंतर जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असाहाय्य पद्धतीने उत्तर देत आहेत, असे मला वाटत आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की माझ्या हातात काहीच नाही. नगरविकास, ग्रामविकास आणि एमआयडीसीकडून प्रदूषण होते. तेवढ्यात समोरच्या बाकावरून जयंत पाटील यांना उद्देशून ‘तुमच्या सारखीच परिस्थिती झाली आहे’ असे विधान केले. त्याला जयंत पाटील यांनीही ‘बरोबर आहे, त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद,’ असे उत्तर दिले. पण, समोरच्या बाकावरून तुमच्या मागे बसणा-यांना आनंद झाला आहे असे विधान केले, त्यावर जयंत पाटील यांनी फक्त स्मितहास्य करत उत्तर दिले.
मी उपाय मांडतेय : पंकजा मुंडे
जयंत पाटील यांच्या प्रश्ना उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी असहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे. कारण हवामान बदल आणि पर्यावरण हा जागतिक विषय आहे. वेगवेगळ्या विभागाकडून टास्क फोर्स तयार करायला वेळ लागणार नाही. जुनी टेक्नॉलॉजी ब-याच ठिकाणी वापरलेली असते. नवी एसओपी तयार होईपर्यंत होणा-या प्रदूषणाचे काय, असा जयंत पाटील यांचा सवाल आहे. आपण अस्तित्वात असणारे एसटीपी नीट चालवले तरी आपण ब-याच अंशी प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यामुळे नव्या टास्क फोर्सचा उपयोग होणार आहे. सांगलीतील शेरी नाल्याबाबत वेगळी बैठक घेऊन टेक्नॉलॉजीबाबत सहकार्य करण्यात आले, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.