इस्लामाबाद : पाकिस्तान लष्कराचे मागील काही वर्षांपासून खच्चीकरण होत आहे. गेल्या आठवड्यात ग्वाद आणि त्यानंतर हवाई दलाच्या मियांवली प्रशिक्षण केंद्रावर झालेले दहशतवादी हल्ल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या लष्कर २०१४ नंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तान लष्कर दहशतवादी संघटनाविरुद्ध ठोस कारवाई करण्यास असमर्थ ठरत असून मागील आठवड्यातील दोन हल्ले हे पाकिस्तानचे लष्कर कमकुवत झाल्याचा पुरावा मानला जात आहे.
पाकिस्तानी लष्कराने २०१४ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ( टीटीपी ) या दहशतवादी गटांच्या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली होती. या ऑपरेशनला झर्ब-ए-अझब असे नाव देण्यात आले होते. ही दशतवादी संघटनांविरोधातील सर्वात मोठी कारवाई मानली गेली. मात्र तेव्हापासून पाकिस्तान लष्कराला संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील काही महिन्यात पाकिस्तान लष्कराची ताकद कमी होत असल्याचे चित्र आहे. देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतरही त्यांच्या समर्थकांनी लष्कराच्या लष्कराच्या अनेक प्रतिष्ठानांवर हल्ले केले तसेच लाहोर कॉर्प्स कमांडरचे घरही जाळले होते.
कंदहार गटाकडून ‘टीटीपी’ला रसद
अफगाणिस्तानात तालिबानकडे असणारी सत्ता आणि सीमेवर कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना तालिबान्यांकडून रसद मिळत असल्यामुळेच पाकिस्तानमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘टीटीपी’ या दहशतवादी संघटनेला अफगाणमधील तालिबानच्या कंदहार गटाकडून समर्थन मिळत आहे. सध्याचे पाकिस्तानमधील सुरक्षा दलांवरील हल्ले यामुळेच होत असल्याचे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे कबीर तनेजा यांनी म्हटले आहे.