इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान प्रचंड घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या आणि त्यानंतर निकाल समोर आले. पण, त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. शिवाय निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.
पाकिस्तानमध्ये निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याची पुष्ठी एका अधिका-यानेच केली आहे. रावळपिंडी विभागाच्या आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, इम्रान खान यांच्या अपक्ष उमेदवारांना हरवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत निकालामध्ये हस्तक्षेप करण्यात आला. फेरफार करुन पीएमएल-एनच्या १३ उमेदवारांना विजयी करण्यात आल्याचा खळबळजनक दावा आयुक्तांनी केला. पाकिस्तानच्या मीडियाने यासंदर्भातील बातमी दिली आहे. आयुक्त लियाकत अली यांनी आपली चूक स्वीकारत याची जबाबदारी घेतली आहे. या कामामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती देखील सहभागी असल्याचे ते म्हणाले आहेत. जे अपक्ष उमेदवार ७० ते ८० हजार मतांनी पुढे होते, त्यांना हरवण्यासाठी खोट्या स्टॅम्पचा आधार घेण्यात आला. त्यामुळे या घोटाळ्याची जबाबदारी घेऊन मी राजीनामा देतो. त्यांनी पंजाबचे राज्यपाल हाजी गुलाल अली आणि अंतरिम मुख्यमंत्री मोहसिन नकवी यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे.
निवडणुकीमध्ये जो काही प्रकार झाला त्यामुळे मला रात्री झोप येत नव्हती. माझ्याकडून जी चूक झाली आहे त्याची शिक्षा मला मिळायला हवी. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांना देखील शिक्षा झाली पाहिजे. माझ्यावर इतका दबाव होता की मी आत्महत्या करणार होतो. पण, लोकांसमोर सत्य आणण्याचा मी निर्णय घेतला, असे लियाकत अली म्हणाले. त्यांनी रावलंिपडी स्टेडियममध्ये प्रेस कॉन्फ्रेंस घेतली होती.
माजी प्रशासकीय अधिका-यांना विनंती आहे की त्यांनी नेत्यांचे ऐकून कोणतंही काम करु नये, असे आवाहन लियाकत यांनी केले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीध्ये कोणतीही धांदली झालेली नाही. अधिका-याला काही चुकीचं करण्यासाठी सांगण्यात आले नव्हते. मात्र, याप्रकरणी तपास करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.