इस्लामाबाद : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तानचा संघ तिरंगी मालिकेसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने फायनल गाठल्यावर दक्षिण आफ्रिका आणि यजमान पाकिस्तान यांच्यातील लढतीला सेमी फायनलचे स्वरुप आले होते. या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेट केलेले ३५० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट चेस करत पाक संघाने फायनल गाठली.
कराचीच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने आफ्रिकेच्या फलंदाजांशी पंगा घेतल्याचा सीन पाहायला मिळाला. आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानी गोलंदाजावर कारवाई केली आहे. त्याच्याशिवाय अन्य दोघांना आयसीसीन धडा शिकवला.
तिरंगी मालिकेतील कराचीच्या मैदानात रंगलेल्या वनडे सामन्यात पाकचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा दक्षिण आफ्रिकेचा युवा बॅटर मॅथ्यू ब्रीट्झके याच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २८ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा बॅटर आणि पाकचा अनुभवी गोलंदाज यांच्यातील वादाला सुरुवात झाली. दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी मैदानातील पंचांना मध्यस्थी करावी लागली होती. हा वाद शाहिन शाह आफ्रिदीला चांगला महागात पडलाय. त्याच्यावर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली.
सिलेब्रेशनमुळे ही दोघेही गोत्यात
शाहीन शाह आफ्रिदीशिवाय दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बवुमारन आउट झाल्यावर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्यामुळे कामरान गुलाम आणि साउद शकील यांच्यावरही आयसीसीने कारवाई केली आहे. तिघांवर आयसीसी आचारसंहिता नियम २.१२ च्या उल्लंघनाप्रकरणी सामन्याच्या मानधनातील २५ टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय तिघांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक डेमेरिट पॉइंट्सही जमा झाला आहे.