इस्लामाबाद : वृत्तसंस्था
जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करण्यासह सिंधू जल कराराला स्थगिती दिली. आधीच पाकिस्तानची स्थिती गंभीर आहे. तेथील अर्थव्यवस्था संकटात आहे. तसेच तब्बल ८४ टक्के जनता दारिद्रयरेषेखाली आहे. अशा स्थितीत भारताने पाकिस्तानचे नाक दाबल्याने शेजारी देश आणखी खाईत लोटला जाणार आहे.
पाकिस्तानची स्थिती अत्यंत गंभीर असून, तिथे गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेथील प्रत्येक माणूस दिवसाला फक्त ५८५ रुपये कमावतो. तेथील ८४ टक्के लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था बुडत आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तानने आयएमएफकडे अनेकदा मदत मागितली. परंतु पाकिस्तानची कृती आणि परिस्थिती पाहता आयएमएफही पाकिस्तानला पैसे द्यायला तयार नाही. २०२४ च्या ताज्या आकडेवारीवरून पाकिस्तानातील सर्वसामान्यांचे जीवन किती कठीण झाले, याची साक्ष मिळते. तेथील नागरिकांचे सरासरी दैनंदिन उत्पन्न फक्त ५८५ रुपये आहे. देशातील गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेचे खरे चित्र दाखवणारा हा आकडा आहे.
२०२४ मध्ये पाकिस्तानचा एकूण जीडीपी ३७४.६ अब्ज डॉलर आहे, जो जगात ४३ व्या क्रमांकावर आहे. पण जर हे देशाच्या लोकसंख्येमध्ये (२५.४४ कोटी) वितरीत केले तर प्रत्येक नागरिकाला वर्षाला फक्त १.३२ लाख रुपये मिळतात. २०२३ मध्ये जीडीपीत ०.२ टक्क्यांची घट नोंदवली. २०२४ मध्ये २.४ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली, परंतु हे पुरेसे नाही. महागाई, कर्ज आणि राजकीय अस्थिरता यामुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे.
दहापैकी चार लोक गरिबीत
धक्कादायक म्हणजे पाकमधील ८४.५ टक्के लोकसंख्या रोज ६.८५ डॉलरपेक्षा कमी उदरनिर्वाह करत आहे. इतकेच नाही तर सुमारे ४० टक्के लोक दररोज ३.६५ डॉलरपेक्षा कमी उत्पन्नावर जगत आहेत. म्हणजे दर दहापैकी चार लोक अत्यंत गरिबीशी झुंजत आहेत. ग्रामीण भागात तर यापेक्षा भीषण स्थिती आहे. बहुतेक लोक एक तर बेरोजगार किंवा अत्यंत कमी वेतनावर अनौपचारिक क्षेत्रात काम करीत आहेत.
व्यापारी तूट कायम
पाकिस्तानची आर्थिक रचना वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल्स आणि रिमोट फ्रीलान्सिंग या क्षेत्रांवर आधारित आहे. २०२४ मध्ये देशाची निर्यात ३८.९ अब्ज डॉलर होती. यात कापडाचा वाटा सर्वाधिक (१६.३ अब्ज डॉलर) होता. त्याचवेळी, आयात ६३.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. यामुळे व्यापार तूट कायम आहे.
१३१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त विदेशी कर्ज
सध्या पाकिस्तानवर १३१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त विदेशी कर्ज आहे. याचा अर्थ सरकार उत्पन्नाचा मोठा हिस्सा केवळ कर्ज फेडण्यावर खर्च करत आहे. सध्या व्याजदर १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे व्यवसाय करणे महाग झाले आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंत सर्वच वस्तू सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
दोनवेळचे अन्न पुरविण्याचे आव्हान
जेव्हा एखाद्या देशाची ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते, तेव्हा आर्थिक अहवाल किंवा जीडीपीवाढीची आकडेवारी पोकळ असते. प्रत्यक्षात नागरिकांना २ वेळचे जेवण देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे.