नवी दिल्ली : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची एक एअर होस्टेस कॅनडामध्ये दाखल झाल्यानंतर अचानक बेपत्ता झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॅनडात ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या खोलीत केवळ तिचा युनिफॉर्म आढळला. त्याचबरोबर ‘थँक यू पीआयए’ असे लिहिलेली एक चिठ्ठी आढळली आहे.
मरियम रजा नामक एअर होस्टेसने २६ फेब्रुवारी रोजी इस्लामाबादहून टोरंटोसाठी उड्डाण केले. पण त्यानंतर दुस-या दिवशी कराचीला जाणा-या फ्लाईटमध्ये तीची ड्युटी होती पण तीने या फ्लाईटसाठी रिपोर्टिंग केलं नाही. ती ड्युटीवर का आली नाही याचा शोध घेण्यासाठी जेव्हा एअरलाईनचे अधिकारी तिच्या हॉटेलवर पोहोचले तेव्हा त्यांना केवळ या होस्टेसचा युनिफॉर्म तिच्या रुमवर मिळाला.
पाकिस्तानच्या एअर होस्टेस परदेशात बेपत्ता होण्याची ही नववी घटना आहे. यंदाच्या वर्षात २०२४ मध्ये घडलेला हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एक एअर होस्टेस अशाच प्रकारे बेपत्ता झाली. तसेच २०२३ मध्ये कमीत कमी ७ क्रू मेंबर्स कॅनडात ड्युटीवर असताना बेपत्ता झाल्या आहेत.
कॅनडासाठी उड्डाण केल्यानंतर पाकिस्तानी एअर होस्टेस बेपत्ता होण्याच्या घटना २०१९ पासून सुरु झाल्या आहेत. तर मिडईस्ट वेबसाईटच्या माहितीनुसार, २०१८ च्या सुरुवातीपासूनच कॅनडा आणि इतर देशांत शरण मागणा-या पीआयएच्या एअर होस्टेस बेपत्ता होत आहेत.