शिर्डी : भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतय, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा करार रद्द केल्याचे खोटे सांगितले जातय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेले पत्रच त्यांनी दाखवले. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातले पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करतंय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा भुसार रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.
इंडस कराराबात मांडली भूमिका
सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो भाडमध्ये गेले ते रद्द केलाय तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप अॅक्शन घ्या ना. जे समोर आले त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला १० वर्षे लागतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
पाक नेत्यांच्या वक्तव्यावर भूमिका
पाकिस्तानी नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत.
२ मे रोजी निदर्शन करणार
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफने केलेलं भाषण महत्त्वाचे आहे. त्यामध्ये त्याने टू नेशन थेअरी मांडली. आपल्या इंटेलिजन्स विभागाने ही माहिती देखील सरकारला दिली. मात्र, त्यावेळी सरकार झोपून राहिले. कोणत्याही सूचना दिल्या नाही. आज आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार.. या उस पार. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी यासाठी २ मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.