पंढरपूर : विठू माऊलीच्या भेटीसाठी लाखो लोक पंढरपूरी दाखल होत असतात. अशावेळी तोबागर्दी पंढरपूरात पाहायला मिळते. दरम्यान गर्दीला नियंत्रीत करून भाविकांना सुरळीत आणि सुरक्षीत दर्शन घेता यावे करीता आता कृत्रिम बुद्धीमत्ता(ए.आय.) तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात संगणक प्रणाली तयार करण्यासाठी शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवून दिल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे.
अवघ्या विश्वाची माऊली आणि गरिबांचा देव मानला जाणा-या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. वर्षातील ४ यात्रांसह दररोज भाविक विठु-माऊलीच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लावतात. पंढरपुरात वर्षाकाठी जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त भाविक महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आणि देशभरातून येत असतात. आषाढी आणि कार्तिकी या दोन महायात्राच्या काळात लाखोंच्या संख्येने भक्तगण शहरांमध्ये पोहोचत असतात. सध्या मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग हा थोडासा अरुंद असल्याने एका बाजूला मुख्यमंत्री पंढरपुरात कॉरिडोर करण्याच्या तयारीत असताना सध्याच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्ता(ए.आय.) तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या संदर्भात संगणक प्रणाली तयार करण्यासाठी शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवून दिल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगण्यात येते. पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकीसह चार मोठ्या यात्रा भरतात. याशिवाय सध्याच्या काळात लहान मोठे सण, लागून येणा-या सुट्या आणि अगदी महिन्याच्या एकादशीला देखील दोन ते तीन लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. वारक-यांसाठी पर्वणी असणा-या आषाढी महासोहळ्याला १५ ते २० लाख भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात.
अशा गर्दीच्या वेळी विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात लाखो भाविकांची दाटी होत असते. याच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला २ कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
दर्शन आणखी सुलभ होणार
पंढरपूरला येणा-या भाविकांना चंद्रभागेचे सुरक्षित स्रान करता यावे, सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यात्रेच्या खूप आधीपासून प्रशासनाच्यावतीने तयारी केली जाते. प्रत्येक वर्षी होणा-या सोहळ्यासाठी आता ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी चालणारी गर्दी, बसलेली गर्दी आणि उभे राहिलेल्या गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. सध्या यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत गर्दीचे व्यवस्थापन केले जाते. आता, मात्र एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे.
भविष्यात होणार मोठा फायदा : ढोले
या तंत्रज्ञानात सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम, व्हीडीओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन सर्व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केले जाणार आहे. हे ए.आय. तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. याचा भविष्यात येणा-या पंढरीतील यात्रा व्यवस्थापनासाठी फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.