मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांचे मंत्रालयात तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा आगमन झाले. शुक्रवारी त्यांनी मंत्रालयातील दालनात प्रवेश करत मंत्री म्हणून त्यांच्या कामकाजाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने अत्यंत साधेपणाने मंत्री पंकजा मुंडे यांनी पदभार स्वीकारत कामकाजाची सुरुवात केली.
या वेळी पंकजा मुंडे यांनी प्रथम गणेशाची पूजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. या वेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारच्या कार्यकाळात महिला व बाल विकासमंत्री म्हणून काम पाहिले होते. २०१९ ते २०२४ या ५ वर्षांच्या काळात पंकजा मुंडे यांच्या कारकिर्दीने अनेक चढ-उतार पाहिले. आता त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. मंत्रालयात ५ वर्षांनंतर त्यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे.