मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे आठवडाभराचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पुढचा आठवडा त्या उपचार घेणार आहेत. पंकजा मुंडे यांनीच ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
‘माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा उपचार घ्यावे लागतील. त्यामुळे माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे. प्रवास करण्याची परवानगी नाही’असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बीडच्या माजलगाव येथे लग्नसमारंभासाठी उपस्थित राहिल्या होत्या. तिथे त्यांची मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये चर्चादेखील झाली होती. माजी मंत्री राजेश टोपे यांचीही लग्नसमारंभाला उपस्थिती होती.
त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पंकजा यांनी ट्वीट करत दुखापत झाल्याची माहिती दिली आहे.
पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. विशेष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात सुरू आहे. तरीही त्यांनी कुठल्याच ओबीसी मेळाव्यात किंवा बैठकीसाठी उपस्थिती लावलेली नाही. उलट त्यांची विधाने ही मराठ्यांच्या बाजूने येत आहेत.