21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबदलीसाठी घेतला कागदोपत्री घटस्फोट

बदलीसाठी घेतला कागदोपत्री घटस्फोट

शिक्षण विभागातील अनोखे कारनामे

अहमदनगर : काहींनी अपंगत्व नसताना दिव्यांग असल्याचे दाखले दिले तर काही महिलांनी कागदोपत्री घटस्फोट घेतले व इच्छित स्थळी आपली बदली करवून घेतली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे हे कारनामे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कोतवाली पोलिसांनी जि.प.च्या शिक्षणाधिका-यांकडे पाच वर्षांतील शिक्षक बदलीचे रेकॉर्डच मागितल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात मात्र कागदोपत्री ज्या नव-यापासून घटस्फोट घेतला, त्याच्याशीच या महिला शिक्षकांचा संसार सुरळीत सुरू असल्याच्याही चर्चा जि.प.च्या वर्तुळात आहेत.

आंतर जिल्हा बदलीअंतर्गत २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत बनावट दाखले दिल्याची ही तक्रार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेक संस्था व संघटनांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाने ती झालीच नाही. त्यामुळे आता पोलिस अधीक्षकांकडे येथील विकास गवळी (राहणार भिस्तबाग, अहमदनगर) यांनी तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चौकशी सुरू केली आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिका-यांना पत्र पाठवून गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदलीवरून हजर झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी व बदलीचे कारण याची माहिती देण्याचे सांगितले आहे.

अशा बदल्यांबाबत झेडपीमध्ये दबक्या आवाजात नेहमी चर्चा असे. पण, आत्तापर्यंत कोणी लेखी तक्रार केली नव्हती. पण गवळी यांनी धाडस करून याबाबत पुढाकार घेतला व थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यात संशयितांची नावे देखील त्यांनी दिली आहेत. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
अपंगत्व व घटस्फोट प्रकरणात खोटे दाखले देऊन बदल्या करून घेतल्याची तक्रार झाली असतानाच जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये देखील काही महिला शिक्षिकांनी परितक्त्या असल्याचे खोटे दाखले देऊन आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत व अशा महिला शिक्षिका आजही आपल्या नवरोबांबरोबर राहात आहेत.

त्यांच्याबद्दलही आता त्यांच्या नावानिशी तक्रारी होणार असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ज्या नर्व­यापासून त्यांनी घटस्फोट घेतला, त्याच्याबरोबरच आजही त्यांचा संसार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीत काय पुढे येते, याची जिल्हा परिषदेच्या वतुर्ळात उत्सुकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR