विनोद उगीले
लातूर : देशाला शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ देणा-या लातूर जिल्हावासीयांची ख-या अर्थाने लोकसभा निवडणुकीत परीक्षेची वेळ आली आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात अल्पशिक्षित उमेदवाराविरोधात उच्चशिक्षित उमेदवाराची लढत होत आहे तेव्हा लातूरकर अल्पशिक्षित उमेदवाराला की उच्चशिक्षित उमेदवारास ‘पास’ करतात, याकडे संपूर्ण राज्याचे, देशाचे लक्ष लागले आहे.
एकेकाळी लातूर जिल्ह्यात निरक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. हा निरक्षरतेचा ठपका लातूर जिल्हावासीयांनी शासनाच्या साक्षरता अभियानाला प्रतिसाद देत पुसून काढला होता तर आज याच लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करीत लातूरचे नाव मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात, देशात पोहोचवत देशाला शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ दिला. शिक्षणाचे धडे घेण्यासाठी राज्यातून, देशातून प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी लातुरात दाखल होत आहेत.
यासोबतच लातूरने जिल्ह्याला, राज्याला, देशाला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. धिरज विलासराव देशमुख यांच्यासह उच्चशिक्षित नेतेमंडळी दिली आहे. सध्या देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे, डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, वंचित बहुजन आघाडीकडून नरसिंग उदगीरकर या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमवणार आहेत.
निवडणूक म्हटल्यावर कोणता उमेदवार गरीब कोणता श्रीमंत याची चर्चा तर होतेच; पण शैक्षणिक वारसा लाभलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार अल्पशिक्षित, कोणता उच्चशिक्षित याचा ऊहापोह तर होणारच. त्यातूनच अल्पशिक्षित उमेदवाराविरोधात उच्चशिक्षित उमेदवार अशी लढत होत असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे दहावी पास आहेत. ते १९८० साली उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूल येथून दहावी उत्तीर्ण झाले आहेत तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे हे उच्चशिक्षित पदव्युत्तर असून त्यांनी एम. बी. बी. एस.,डी. ओ. एम. एस. (नेत्ररोग) तज्ज्ञ हे वैद्यकीय शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्यांनी आपले प्रथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राणी अंकुलगा, ता. शिरूर अनंतपाळ येथून तर माध्यमिक शिक्षण लातुरातील देशीकेंद्र विद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयातून घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे एम. कॉम. असून त्यानी पदव्युत्तर शिक्षण मुंबई
विद्यापीठातन्ूा घेतले आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात सरळ-सरळ लढत होत असलेल्या डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे व सुधाकर श्रृंगारे या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पाहता अल्पशिक्षित व उच्चशिक्षित उमेदवारांत लढत होत असल्याचे स्पष्ट आहे. आता देशाचे भवितव्य घडविण्यासाठी ’हुशार लातूरकर’ २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे उच्चशिक्षित उमेदवारास प्राधान्य देतात की अल्पशिक्षित उमेदवारास पुन्हा संसदेत पाठवितात, हे पाहावे लागणार आहे.