नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतील १४१ विरोधी खासदारांच्या निलंबनावरून खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भाजपच्या चिंतन बैठकीप्रमाणे संसद चालवता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
हैदराबादचे खासदार ओवेसी म्हणाले, १४१ विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. विरोधी खासदारांचे अचानक निलंबन किंवा हकालपट्टी झाल्यास लोकशाहीत काय उरते? भाजपकडे संसदेत प्रचंड बहुमत आहे, तरीही विरोधी आवाजाबाबत ते असहिष्णु का आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
मंगळवारी (१९ डिसेंबर) लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी ४९ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले. याच्या एक दिवस आधी, सोमवारी (१८ डिसेंबर) लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. याआधी १४ डिसेंबर रोजी लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील एका खासदारांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. आतापर्यंत एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.