22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपार्थ पवार नॉट रिचेबल?

पार्थ पवार नॉट रिचेबल?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर पार्थ अजित पवार हे पक्षामध्ये सक्रिय झाले. शरद पवार यांच्या हातात पक्ष असताना सक्रिय नसणारे पार्थ पवार मात्र गल्लोगल्ली फिरू लागले होते, पण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय दिसले नाहीत, पण जेव्हा अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पार्थ पवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. कार्यकर्ते गोळा करून पार्थ पवार नवी इनिंग खेळायच्या तयारीत होते. पण गेले काही दिवस अचानक ते दिसेनासे झाले आहेत. पार्थ पवार यांच्या पुण्यातही भेटीगाठी सुरू होत्या.

दरम्यान, जानेवारी महिन्यात पार्थ पवार थेट पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या गजानन मारणे याच्याच भेटीला पोहोचले. यानंतर उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने गुंडाची भेट घेतल्याची टीका सुरू झाली. यानंतर वडील अजित पवार हे पार्थ पवार यांच्यावर चांगलेच संतापले होते. पार्थ पवार यांच्या नाराजीचे दुसरे कारण म्हणजे राज्यसभा आपल्याला मिळावी अशी त्यांची इच्छा होती. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती. कागदपत्रांचीही जुळवाजुळव पूर्ण झाली. मात्र ऐनवेळी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि पार्थ पवार हे पुन्हा नाराज झाले.

पक्षात नेमणुकीत कार्यकर्त्यांना पदे मिळाली नाहीत त्यामुळे चिडलेले पार्थ पवार पुन्हा कोषात गेले. ते कुठे आहेत याची विचारणा केल्यावर वडिलांकडून मात्र मिश्किल टिप्पणी करून पार्थ पवारांची बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार हे पार्थ पवार यांना सातत्याने लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा, अनुभव घेण्याचा सल्ला देतात. मात्र पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीत सातत्य नसल्यामुळे अजित पवार त्यांच्या राजकारणात करिअर करण्याला फारसे अनुकूल नाहीत. याउलट धाकटे चिरंजीव जय पवार हे कुठल्याही मागणीशिवाय आईच्या प्रचारात, वडिलांच्या निवडणुकीच्या काळात शांततेत कार्यरत राहिले. त्यामुळे नाराज असलेल्या पार्थ पवार यांना जय पवार यांचीच घरात स्पर्धा आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR